न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२५) :- सावकाराच्या जाचाला कंटाळून सामूहिक आत्महत्या प्रकरणात बचावलेल्या इसमावर त्याच्या दहा वर्षांच्या मुलाच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात इसमाची पत्नी आणि मुलगा दगावला तर इसम बचावला होता. ही घटना शुक्रवारी (दि. १७) रात्री चिखली, सोनवणे वस्ती येथील सोनिगरा निलांगण सोसायटी येथे घडली होती.
याबाबत चिखली पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश खारगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन वैभव मधुकर हांडे (वय ५०, रा. फ्लॅट नंबर बी-१२०१, सोनिगरा निलांगण सोसायटी, सोनवणे वस्ती, चिखली) असे आरोपीचे नाव आहे.
वैभव हांडे यांनी खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्याची पत्नी व मुलाचा मृत्यू झाला असून वैभव हे बचावले आहेत. मात्र, आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी आपल्या दहा वर्षांच्या मुलाचा कशाच्या तरी सहाय्याने व गळा आवळून खून केल्याचा गुन्हा पोलिसांनी वैभव याच्यावर दाखल केला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.











