- पोलिस भरतीसाठी व्यायाम करणाऱ्या तरुणांना बसने चिरडले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बीड (दि. २० जानेवारी २०२५) :- पोलिस भरतीसाठी व्यायाम करत असलेल्या तिघांना बसने चिरडल्याची घटना बीड ते परळी रोडवर रविवारी सकाळी सहाच्या सुमारास घोडका राजुरीनजीक घडली. यात तीन तरुण जागीच ठार झाले आहेत. दरम्यान, अपघातात ठार झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये मदत देण्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
सुबोध बाबासाहेब मोरे (२०), विराट बब्रूवान घोडके (१९) व ओम सुग्रीव घोडके (२०, सर्व रा. घोडका राजुरी) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. घोडका राजुरी गावातील पाच तरुण बीड-परळी रोडच्या बाजूला व्यायाम करत होते. या वेळी बीडहून परभणीकडे जात असलेल्या भरधाव वेगातील बसने यातील तिघांना चिरडले. प्रसंगावधान राखून दोन तरुणांनी उड्या मारल्याने ते बचावले. अपघाताची माहिती परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत या तरुणांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवले. दुपारी तीनच्या सुमारास तिघांवर घोडका राजुरी परिसरात अंत्यसंस्कार करण्यातआले. या प्रकरणात बसचा चालक कुलदीप मुसळे याच्याविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातास कारणीभूत ठरलेली बस बीडवरून परभणीकडे जात होती. अपघात घडल्यानंतर काही अंतरावर जाताच चालकाने ती परत वळवून बीडकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावरून काही अंतरावर जाऊन ही बस सोडून त्याने पलायन केले. दरम्यान, पहाटे सहाच्या सुमारास धुके होते. यामुळे व्यायाम करणारी मुले दिसली नाहीत, असे चालकाने सांगितले.
पोलिस अथवा सैन्यात भरती होण्यासाठी घोडका राजुरी येथील हे पाच तरुण गेल्या वर्षभरापासून व्यायाम करत होते. घोडका राजुरीपासून धावत जात गावातीलच घोडके यांच्या हॉटेलजवळ ही मुले व्यायामासाठी थांबायची. नेहमीप्रमाणे गावातून पाच वाजता निघून ही मुले धावत त्या हॉटेलपर्यंत गेली होती.











