- पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश नाही..
- उपमुख्यमंत्री अजित पवारांची स्पष्टोक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
शिर्डी (दि. २० जानेवारी २०२५) :- ‘महापालिकेच्या निवडणुकीत चारचा प्रभाग राहणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना काहींनी चारचा प्रभाग करा, काहींनी दोनचा प्रभाग करा अशा मागण्या केल्या होत्या. मात्र, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यानंतर पुन्हा राजकीय समीकरणे बदलली आणि चारच प्रभाग करण्यात येणार आहे’, असे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर महायुतीमधील सर्वच पक्ष आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शिर्डीत शिबिर झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच कामाला लागण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा असला पाहिजे. खरे तर सर्व नेत्यांनी सकाळी कामाला लवकर सुरुवात केली पाहिजे. त्याप्रमाणे सर्वांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मला कार्यकर्त्यांना एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या निमित्ताने जे उमेदवारीसाठी किंवा पक्षाच्या पदासाठी उत्सुक आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. उमेदवारांनी प्रत्येक विभागानुसार एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे. यंदा बहुतेक निवडणूक ही प्रभागानुसार होईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनावाढीसाठी घरोघरी जाऊन सभासद नोंदणी करावी. पक्ष सोडून गेलेले अनेक कार्यकर्ते, तसेच नेते पुन्हा पक्षात प्रवेश द्यावा, अशी विनंती करीत आहेत, मात्र जे पक्ष सोडून गेले, त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.











