- रावेतमधील चंद्रभागा कॉर्नरसमोरील प्रकार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 25 जानेवारी 2025) :- ‘इसको जादा मस्ती आई है, इसको मालुम नही हम कोन है? इसको आज जिंदा नही छोडेंगे’ अशी फिल्मी डायलॉगबाजी करीत सोसायटीसमोरच दुचाकीस्वार तरुणाला एक महिला आणि तीन तरुणांनी बेदम मारहाण केली. कोयत्याच्या साह्याने त्याच्यावर सपासप वार केले. त्यामुळे दुचाकीस्वार तरूण गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान दुचाकीवरून घरी येत असताना एका सोसायटीसमोर अचानक एक मुलगा दुचाकीला आडवा आला. सोसायटीसमोर उभे असलेल्या एक महिला आणि दोन तरुणांना दुचाकीस्वार तरूणाने ‘मुलाकडे लक्ष द्या’ असे म्हणाल्याचा राग आल्याने त्यांनी हे कृत्य केले आहे.
हा प्रकार गुरुवारी (दि. 23) रोजी सायंकाळच्या सुमारास रावेत येथील चंद्रभागा कॉर्नरसमोरील एका सोसायटीसमोर घडला. याप्रकरणी कुलदीप रोकडे यांनी अंकुश बिडलान, भावेश उर्फ चिकू, पंचवीस वर्षीय महिला आणि एक विधीसंघर्षीत बालक यांच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चाटे हे करीत आहेत.











