- मग भर कार्यक्रमात निघाला ‘कंजूषषणा, दिलदार आणि क्रेडिट’ चा विषय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२५) :- पुणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यास नवीन जिल्ह्यास ‘शिवनेरी’ नाव द्यावे, भविष्याचा विचार करता पिंपरी-चिंचवड शहरासाठी नवीन जलस्रोत निर्माण करावेत, अशा मागण्या भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाषणात केल्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ६) चिखलीतील जाधववाडी येथे झाले. यावेळी ते बोलत होते.
तोच धागा पकडून अजित पवार म्हणाले की, आतातरी कोणताच जिल्हा निर्माण करण्यात येणार नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्याचेही विभाजन होणार नाही. २०५४ ला पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या पुण्यापेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. सध्याच्या पाण्याचा पुरवठा कमी पडणार आहे. भविष्याचा विचार करता शेजारील टाटांच्या धरणातील पाणी घ्यावे लागेल. समुद्राचे पाणी प्रक्रिया करून पिण्यासाठी वापरता येईल का, असाही विचार सुरू आहे.
दरम्यान पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय उभारणीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे विधान आ. महेश लांडगे यांनी केल्यानंतर पवार संतप्त झाले. ते म्हणाले, ‘महेश लांडगे यांना माझे नाव घ्यायला का वाईट वाटले, हे मला माहीत नाही. परंतु, अख्ख्या पिंपरी-चिंचवडला माहीत आहे की, १९९२ ला मी तुमचा खासदार झालो. १९९२ ते २०१७ पर्यंत कोणी पिंपरी-चिंचवड सुधारणा केल्या? आज २५ वर्षे झाली. प्रत्येक गोष्ट मी पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष देऊन करत असतो. येथील अधिकाऱ्यांना विचारा, या इमारतींमध्ये मी किती वेळा येतो, किती वेळा चौकशी करतो आणि किती वेळा बसतो. शेवटी आपण महायुतीमध्ये आहोत. एवढाही कंजूषषणा दाखवू नका, मी दिलदार आहे. ज्याने केले, त्याला त्याचे क्रेडिट देत असतो. ज्याने चांगले काम केले आहे, त्याला चांगले म्हणायला शिका.”