न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाईड डीसी रुल) लागू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. १२) मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहातील मंत्रिमंडळ परिषद सभागृहात अनुकूलता दर्शविली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्याच्या सूचना त्यांनी पीएमआरडीए प्रशासनाला दिल्या आहेत. पीएमआरडीए क्षेत्रासाठी युनिफाईड डीसी रुल लागू झाल्यास चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढणार आहे. त्याचा पीएमआरडीए क्षेत्रातील बांधकामांना फायदा मिळू शकणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पीएमआरडीएची सभा झाली. या सभेत हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. सध्या पीएमआरडीए आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वगळता राज्यभरामध्ये युनिफाईड डीसी रुल लागू आहेत. पीएमआरडीएला तूर्तास ही नियमावली लागू नसल्याने त्याचा फायदा पीएमआरडीए क्षेत्रातील बांधकामांना मिळण्यात अडचणी येत आहेत.
पुणे महानगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट २३ गावांसाठीदेखील ही युनिफाईड डीसी रुल लागू आहेत. युनिफाईड डीसी रुलनुसार बांधकामासमोर ९ ते ३० मीटर रुंद रस्ता असल्यास रुंद रस्त्याच्या प्रमाणात १.१० ते ३ एफएसआयपर्यंत फायदा मिळू शकणार आहे. सध्या लागू असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार (डीसी रुल) इमारतीसमोर ३० मीटर रुंद रस्ता असल्यास भूखंडावरील बांधकामासाठी जास्तीत जास्त २ चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरता येत आहे. युनिफाईड डीसी रुल लागू झाल्यानंतर जास्तीत जास्त ३ एफएसआयपर्यंत फायदा मिळू शकणार आहे.
पीएमआरडीए क्षेत्रासाठी युनिफाईड डीसी रूल लागू करण्याचा विषय बुधवारी (दि. १२) प्राधिकरण सभेसमोर मंजुरीसाठी होता. मुख्यमंत्र्यांनी या विषयाला अनुकूलता दर्शविली आहे. युनिफाईड डीसी रुल लागू करण्यासाठी प्रस्ताव ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पीएमआरडीए क्षेत्रातील बांधकामांसाठी एफएसआय वाढेल. तसेच, पीएमआरडीएच्या उत्पन्नातही वाढ होईल.
– डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए…











