- शिवसेनेच्या वंसत मोरेंकडून गंभीर आरोप..
- रुपाली चाकणकरांकडून देखील घटनेचा तीव्र निषेध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२५) :- गावी निघालेल्या तरुणीवर स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात शिवशाही बसमध्ये बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून दत्तात्रय रामदास गाडे असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे.
ही घटना नेमकी कशी घडली हा सगळा घटनाक्रम उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितला आहे. त्या म्हणाल्या, “पीडित मुलगी पुण्यात काम करते. ती सातारा या ठिकाणी तिच्या गावी चालली होती. सकाळी साधारण पावणेसहाच्या सुमारास ती बसची वाट बघत होती. त्यावेळी आरोपी तिकडे गेला होता. आरोपीने गोड बोलून तिच्याशी ओळख करुन घेतली आणि कुठे जाते आहेस असं विचारलं? त्यावर मुलीने फलटणला जायचं आहे. तर त्याने तिला सांगितलं बस इथे नाही तर दुसऱ्या ठिकाणी लागते. चल मी तुला बसजवळ घेऊन जातो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी आरोपीसह बसजवळ जाताना दिसते आहे. त्यावेळी सदर मुलगी अंधार का आहे? हे बघायला आतमध्ये गेली. तेव्हा आरोपी तिच्या मागोमाग बसमध्ये शिरला त्याने बसचा दरवाजा लॉक केला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान तिथून अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर मुलीने हा सगळा प्रकार मित्राला सांगितला. मित्राने तिला सांगितल्यानंतर ती आमच्याकडे म्हणजेच पोलीस ठाण्यात आली. तिच्या तक्रारीनंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासलं. दरम्यान या घटनेचे पडसाद पुण्यात उमटायला सुरुवात झाली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी या ठिकाणी पाहणी केली. तसंच स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात रोज बलात्कार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बलात्काराच्या घटनेचा निषेध करत केबीनची तोडफोड करण्यात आली. या लोकांनी चार बसेसचं लॉजिंग केलं आहे. याचा अर्थ असा होतो की याच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत इथे रोज बलात्कार होतात. मीडियाने सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या तर कळेल बसेस मध्ये कंडोम पडले आहेत. आगाराच्या मागच्या बाजूला या बसेस ठेवल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी या लोकांचा हात आहे. आगार प्रमुखांचं निलंबन केलं पाहिजे आणि सुरक्षा रक्षकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली.
रुपाली चाकणकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अनेक तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात. तसं पाहिलं तर पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत. पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असतं. पण स्वारगेट येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे.”










