न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मंगळवारी (२६ फेब्रुवारी) रात्री उशिरा दिले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आस्थापना मंडळाची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत काही अधिकाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदली करण्याबाबत निर्णय झाला. त्यानुसार तीन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वसंतराव कोळी यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. वाहतूक शाखेत कार्यरत असलेले अंकुश पांडुरंग बांगर यांची चिंचवड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बदली झाली. तर परकीय नोंदणी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मायाप्पा लांडगे यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.