- हिंजवडीतील वीजपुरवठा सक्षम होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२५) :- महावितरणच्या पिंपरी विभागातील सांगवी उपविभागाचे विभाजन करून नवीन हिंजवडी उपविभागाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे हिंजवडीतील वीजपुरवठा सक्षम होणार आहे.
पुणे परिमंडलाने सांगवी उपविभागाच्या विभाजनाचा आणि नवीन हिंजवडी उपविभाग व चार नवीन शाखा कार्यालयांच्या निर्मितीचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला महावितरणने नुकतीच मान्यता दिली आहे.
सांगवी उपविभागाच्या पुनर्रचनेत सांगवी उपविभागात आता सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख व वाकड अशी चार शाखा कार्यालये राहतील. तर, नवीन हिंजवडी उपविभागात ताथवडे, हिंजवडी आणि हिंजवडी एमआयडीसी अशी तीन शाखा कार्यालये असणार आहेत. पुनर्रचनेनंतर सांगवी उपविभागात एक लाख ४० हजार आणि हिंजवडी उपविभागात एक लाख १६ हजार वीजग्राहक असतील.
हिंजवडी उपविभाग कार्यालयामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक लेखापालाचे प्रत्येकी एक पद, निम्नस्तर व उच्चस्तर लिपिकांची सहा पदे, तसेच मुख्य तंत्रज्ञ, शिपाई यांचे प्रत्येकी एक पद अशी १२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच नवनिर्मित पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड आणि हिंजवडी एमआयडीसी शाखा कार्यालयांमध्ये सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, कनिष्ठ कार्यालयीन सहायक अशी प्रत्येकी १९ पदे मंजूर करण्यात आली आहेत.
पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत हिंजवडी, चाकण एमआयडीसी व भोसरी दोन या तीन उपविभागांची, ११ शाखा कार्यालयांची, तसेच नवीन ८८ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञाननगरी असलेल्या हिंजवडीसाठी नवीन उपविभाग व शाखा कार्यालयाबाबत वीजग्राहक व लोकप्रतिनिधींची मागणी होती. ती पूर्ण झाल्यामुळे वीज व ग्राहकसेवा आणखी दर्जेदार होईल, पुणे परिमंडलचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सांगितले.












