न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२५) :- महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अशामध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे समोर आले होते. अखेर याबाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समोर आले आहे.
शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासमवेत अनेक नेत्यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांना पत्र दिले आहे. आज मातोश्रीवर झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासाठी नेत्याची निवड करण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. तसेच त्यांच्या नावाची विधिमंडळाकडे शिफारस करण्याची घोषणा केली.
आम्ही आज विधानसभेच्या अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे. आम्हाला खात्री आहे की, लवकरात लवकर यासंदर्भातील निर्णय होईल. तसेच अर्थसंकल्पाच्या आधी हा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारे कारभार करत आहेत, ते पाहता विरोधी पक्षनेतेपदाच्या बाबतीत निर्णय लवकर होईल अशी आमची आपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेतेपदासाठी काही फॉर्म्युला ठरलाय का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदाचा काही फॉर्म्युला महाविकास आघाडीत ठरलेला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.










