न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२५) :- पिंपळे निलख येथील इंगवले नगर परिसरातील क्षितिज अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांना आग लावल्याची घटना घडली आहे.
आरोपीने कुठलातरी ज्वालाग्रही पदार्थ वाहनांवर टाकत ही आग लावली होती. त्यामुळे पार्किंगमधील रहिवाशांनी पार्क केलेल्या जवळपास 13 दुचाकी आगीत जळून खाक झाल्या आहेत. हा प्रकार बुधवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडला. यात फिर्यादी यांचे जवळपास नऊ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याप्रकरणी फिर्यादी नेमिनाथ जामगे यांनी आरोपी स्वप्निल पवार याच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार सांगवी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिखरे हे करीत आहेत.














