न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२५) :- सक्षमा प्रकल्पाअंतर्गत शहरातील सक्रीय महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येत आहे. याशिवाय त्यांना मालमत्ता कर संकलन, नवी दिशा, अग्नि सुरक्षा सर्वेक्षण यांसारख्या महापालिकेच्या विविध उपक्रमात सहभागी करून घेऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा मानस आहे. तसेच बचत गट मॉल यांसारख्या संकल्पना राबवून त्यांना कायमस्वरूपी स्वत:चा हक्काचा व्यवसाय सुरू करून देणे हा यामागचा उद्देश आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हस ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांसाठी सक्षमा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पात सहभागी महिला बचत गटांसाठी महिला दिनाचे औचित्य साधून पिंपरी कॉलनी येथे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाजवळील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी नगरसदस्या सुजाता पालांडे, उषा मुंडे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, प्रशासन अधिकारी पुजा दूधनाळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, टाटा स्ट्राईव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय वंजारी, टाटा मोटर्स गृहिणी प्रकल्प अध्यक्षा शिल्पा देसाई, सीएसआर प्रमुख अमिता जाधव, सल्लागार अनिता राजन तसेच महापालिका कर्मचारी आणि सक्षमा प्रकल्पातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, शहरामध्ये सध्या १५ हजारांपेक्षा जास्त महिला बचत गट आहेत. त्यामधील सुमारे ४ हजार ५०० महिला बचत गट सक्रीय आहेत. या महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महापालिकेने टाटा स्ट्राईव्हसोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत सक्षमा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय या प्रकल्पामध्ये अधिकाधिक महिला बचत गटांना सामिल करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.














