न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२५) :- चऱ्होली परिसराचे वाढते विस्तारीकरण लक्षात घेऊन या भागासाठी नवीन उप डाकघर सुरू करण्याचा निर्णय टपाल कार्यालयाने घेतला आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि. ८) हे नवीन उप कार्यालय कार्यरत होत आहे. त्यामुळे चऱ्होली परिसराला आता ४११०८१ हा नवीन पिनकोड मिळाला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी होत असलेल्या उप डाकघराचे उद्घाटन होणार आहे.
चऱ्होली परिसरातील पत्रव्यवहाराचे काम आतापर्यंत आळंदी देवाची टपाल कार्यालय येथे सुरू होते. त्यामुळे पत्रव्यहारामध्ये आळंदी प्रमाणेच चऱ्होलीसाठी देखील ४१२१०५ हा पिनकोड वापरला जात असे. मात्र, या भागातील वाढत्या वसाहती आणि कामाचा व्याप लक्षात घेऊन उप डाकघराला परवानगी मिळाली आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला पुणे क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये, पुणे क्षेत्राच्या निदेशक सिमरन कौर उपस्थित राहणार आहेत. यावेळी टपाल खात्यातील विविध श्रेणीमधील महिलांचा सत्कार आणि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.











