न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२५) :- तीसहून अधिक सोसायट्यांमधील सुमारे दोन हजारांहून अधिक आयटी अभियंते शनिवारी (ता. ८) रस्त्यावर उतरून मूक मोर्चा काढणार आहेत.
ताथवडे – वाकड येथील ताकभाते कॉर्नर जवळील कोहिनूर कोर्ट यार्ड सोसायटीपासून सकाळी ८ वाजता मोर्चाला सुरुवात होईल.
कोहिनूर कोर्टयार्ड सोसायटी, एलिट होम्स सोसायटी, झेनिथ सोसायटी, ईशा फूटप्रिंट, शनी मंदिर, इंदिरा स्कूल रस्ता, ताकभाते कॉर्नर मार्गे पुढे वाकडकर कॉर्नर येथे त्याची सांगता होणार आहे.
शनी मंदिर, इंदिरा स्कूल रस्ता भागातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे असून ती सध्या धोकादायक पातळीवर आहे. परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात सिमेंट मिश्रित धूळ साचल्यामुळे हवेचे प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून श्वसनाचे विकार, अॅलर्जी, डोळ्यांचे त्रास आणि त्वचारोग वाढले आहेत. याशिवाय, रस्त्यांची स्वच्छता न राखल्यामुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.











