- केस पेपरसाठी स्मार्ट हेल्थ कार्ड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२५) :- महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचा कारभार डिजिटल केला जाणार आहे. त्याअंतर्गत रुग्णांना स्मार्ट हेल्थ कार्ड देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे रुग्णाचे आजार आणि उपचाराचा इतिहास कळणार आहे. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व रुग्णालयांच्या कामकाजाची माहिती पाहता येणार आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी शहरात ८. रुग्णालये आणि ३२ दवाखाने कार्यरत आहेत. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय, नेत्र रुग्णालय (अजमेरा कॉलनी), आकुर्डी, पिंपरी, थेरगाव आणि चिंचवड येथील रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची माहिती डिजिटल स्वरूपात जतन करता यावी, यासाठी २०१० पासून मई हेल्थ कार्डप्रणाली सुरू केली होती. या हेल्थ कार्डचे एका खासगी कंपनीकडे काम सोपविले होते.
वायसीएम रुग्णालयात पीव्हीसी स्मार्ट कार्ड स्वरुपातील हेल्थ कार्ड देणे बंद केले आहे. त्याऐवजी एका चिठ्ठीवर हे कार्ड प्रिंट करून दिले जात आहे. त्यामुळे रुग्णांचा डिजिटल डाटा जतन करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सुरुवातीला नवीन कार्ड काढताना ३० रुपये आणि नंतरच्या उपचारासाठी दरवेळी दहा रुपये केस पेपरसाठी घेतले जात होते. मात्र, कोरोना काळात म्हणजेच २०२० पासून हे हेल्थकार्ड बंद करण्यात आले. आता टोकन चिट्ठीवर हे कार्ड प्रिंट करुन दिले जात आहे.
महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी केंद्रीय डिजिटल प्रणाली सुरू केली जाणार आहे. त्यामुळे हेल्थ कार्ड बंद करून रुग्णांना नवीन स्मार्ट हेल्थ कार्ड दिले जाणार आहे. याबाबतच्या व्यवस्थापनासाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरु आहे. पुढील पाच महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली.











