न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने रानजाई महोत्सव’ व २८ वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन नियोजित महापौर निवास निगडी प्राधिकरण येथील मोकळ्या मैदानात ७ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता मनोज सेठीया, बाबासाहेब गलबले, उप आयुक्त अण्णा बोदडे, माजी नगरसेवक अमित गावडे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, महोत्सवाच्या माध्यमातून टेरेस गार्डन, घरगुती रोपसंवर्धन आणि लँडस्केप डिझाइन यांसारख्या स्पर्धा घेतल्या जातात, स्पर्धेमध्ये विविध शोभिवंत फुले, फळझाडे आणि रोपांची आकर्षक मांडणी केली जाते. या घटकांचे परीक्षकांमार्फत मूल्यमापन करून विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली जातात. सलग तीन दिवस चालणाऱ्या या हरित सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमाला पाठबळ द्यावे.
रानजाई महोत्सवात विविध फळे, फुले, रोपे आणि वृक्षांचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये विविध विभाग बनविण्यात आले आहेत. त्यामध्ये शोभिवंत कुंड्या, कलात्मक मांडणी, गुलाबपुष्प, हंगामी फुले, फळे, उत्तम भाज्यांचा संग्रह, निसर्ग व पर्यावरणावर आधारित छायाचित्रे, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू, बाग स्पर्धा, वृक्षसंवर्धन स्पर्धा आदी विभाग आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध गटातील स्पर्धांसाठी फिरता चषक…
रानजाई महोत्सवात ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामध्ये शोभिवंत पाना फुलांच्या कुंड्यांच्या स्पर्धा, कारखानदार बाग स्पर्धा, खाजगी बंगल्याभोवतालच्या बाग स्पर्धा तसेच वृक्षारोपण स्पर्धांचे आयोजन केले जाते. या गटांमधील विजेत्यांना महापालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने फिरते चषक तसेच रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत. ९ मार्च रोजी कार्यक्रमस्थळी बक्षिस वितरण समारंभ संपन्न होणार आहे.











