न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२५) :- आरोग्य विमा योजनेबाबतच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा ‘धन्वंतरी गोल्ड योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यरत आणि सेवानिवृत्त अशा दहा हजार ४९३ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना योजनेचा लाभ होणार आहे.
या योजनेत एका कुटुंबासाठी वर्षाकरिता २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना १० वर्षांसाठी लागू करण्यात आली असून याची अंमलबजावणी १२ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेली ‘धन्वंतरी स्वास्थ्य योजना’ बंद करून २०२४ मध्ये आरोग्य विमा योजना सुरू करण्यात आली होती. पण, कालांतराने याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावरून कर्मचाऱ्यांमध्ये दोन गट पडले होते. चर्चेअंती पूर्वीच्या धन्वंतरी स्वास्थ्य योजनेत सुधारणा करून ‘धन्वंतरी गोल्ड योजना’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा कार्यरत ६ हजार ७५९ कर्मचारी, पती, पत्नी आणि दोन अपत्य तर सेवानिवृत्त झालेल्या ३ हजार ७३४ कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीला योजनेचा लाभ मिळणार आहे. कायमस्वरुपी दिव्यांग असलेल्या त्यांच्या अपत्यालाही योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत सर्व आजार समाविष्ट आहेत.













