- मेट्रो स्टेशनलगतच्या ‘टीओडी’ क्षेत्राच्या नकाशांना अद्याप मंजुरी नाहीच..
- शेजारच्या पुणे महापालिकेची कोटींची झेप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२५) :- पिंपरी ते स्वारगेट मेट्रो सेवा सुसाट सुरु आहे. त्यातून महामेट्रोला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळू लागला आहे. दुसरीकडे राज्य शासनाच्या नगरविकास खात्याच्या आडमुठेपणामुळे पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो स्टेशनलगतच्या टीओडी क्षेत्राच्या नकाशांना अद्याप मंजुरी मिळू शकली नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळणाऱ्या हक्काच्या उत्पन्नापासून वंचित रहावे लागत आहे.
शेजारच्या पुणे शहरात पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मेट्रो मार्गावर मेट्रोसेवा सुरु होऊन काही वर्षाचा काळ उलटला आहे. मेट्रो स्टेशनच्या परिसरातील ‘ट्रांझिट ओरिएंटेड झोन’मध्ये (टीओडी) पुणे महापालिकेने गेल्या काही वर्षात कित्येक बांधकाम प्रकल्पांना मान्यता देत त्यातून शेकडो कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. तर, दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरात सर्वात आधी मेट्रो सेवा सुरु होऊन देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला अद्यापही त्यातून काहीच उत्पन्न मिळू शकले नाही. अपवाद हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा. वाकड मेट्रो स्टेशन परिसरात दिलेल्या बांधकाम परवानगीतून फक्त दोन कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळाले आहे.
दरम्यान टप्पा १ अंतर्गत पिंपरी ते स्वारगेट अशी मेट्रो सेवा सुरु झाली आहे. तर, टप्पा दोन मध्ये पिंपरी ते भक्ती शक्ती, निगडी असे मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. महापालिकेच्या हद्दीत पिंपरी, संत तुकाराम नगर, नाशिक फाटा, फुगेवाडी, दापोडी अशा पाच मेट्रो स्टेशनचा ‘ट्रांझिट ओरिएंटेड झोन’मध्ये (टीओडी) समावेश आहे. मेट्रो स्टेशनच्या ५०० मीटरच्या परिसरात रस्ता रुंदीनुसार चार ते पाच एफएसआय वापरून बांधकाम करण्याची परवानगी आहे. मात्र, महामेट्रोच्या दोन्ही मार्गांवरील मेट्रो स्टेशनलगतच्या टीओडी क्षेत्राच्या नकाशांना राज्य शासनाची अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे पिंपरी ते स्वारगेट मेट्रो हद्दीतील तब्बल पाच मेट्रो स्टेशन आवारात बांधकाम प्रकल्पांना महापालिका परवानगी देऊ शकत नाही. त्यामुळे कित्येक कोटींच्या उत्पन्नावर महापालिकेला पाणी सोडावे लागत आहे.
मेट्रो सुरू झाल्यानंतर नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर कमी करावा, रस्त्यावरील गर्दी कमी व्हावी, या नागरिकांनी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करावा, प्रवासी संख्या वाढावी यासाठी मेट्रो स्टेशनच्या परिसरात लोकसंख्येची घनता वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असून, त्यासाठी बांधकाम नियमावलीत बदल करण्यात आला आहे.
मेट्रो स्टेशनच्या परिसरातील लोकसंख्येची घनता वाढून मेट्रोचा वापर वाढला पाहिजे, यासाठी ट्रांझिट ओरिएंटेड झोन निश्चित करण्यात आला आहे. शहराच्या इतर भागाच्या तुलनेत या झोनमध्ये वाढीव एफएसआय वापरण्याची परवानगी दिली जाते. त्यामधून महापालिकेला उत्पन्न मिळते. शहरातील मेट्रो स्टेशनच्या टीओडी क्षेत्राच्या नकाशांना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. वाकड मेट्रो परिसरात तीन प्रकल्पांना दिलेल्या परवानगीतून दोन कोटींचे उत्पन्न महापालिकेला मिळालेले आहे. – मकरंद निकम, शहर अभियंता – पिंपरी चिंचवड मनपा…















