न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२५) :- प्रभाग क्र. २ बोऱ्हाडेवाडी, मोशी प्राधिकरण येथील पेठ क्र. ५ आणि ८ येथील ताब्यात आलेल्या जागेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा १०० फुट उंच पुतळा उभारण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिका सभेत मान्यता दिली.
प्रभाग क्र. २ बोऱ्हाडेवाडी मोशी प्राधिकरण येथील पेठ क्र. ५ आणि ८ (पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी आणि कन्वेन्शन सेंटर PIECC) येथील १०,११७.१४ चौरस मीटर (२.५ एकर) जागेचा आगाऊ ताबा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण स्मारकासाठी देण्यात आला आहे.
तथापि महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णयानुसार राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यासाठी मान्यता देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आला असून त्यानुषंगाने प्राधिकरण पेठ क्र. ५ आणि ८ येथील महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलेल्या जागेवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा १०० फुट उंच पुतळा उभारण्याच्या ठरावास प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिका सभेत मंजुरी दिली आहे.

















