न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये एसइइ लर्निंग प्रकल्प राबविण्यासाठी हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्ट्ररनेटिव्स लडाख येथे अभ्यासदौरा आयोजित करण्याबाबतच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये मानसिक, भावनिक, सामाजिक, राष्ट्रीय जाणीव निर्माण व्हावी यासाठी एसइइ लर्निंग socio emotional and ethical life skill learning ) हा नवीन प्रकल्प निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणार आहे.
या अभ्यासदौऱ्यात आयुक्त अतिरिक्त आयुक्त १, सहाय्यक आयुक्त , प्रशासन अधिकारी , शिक्षण विभाग, एसइइ लर्निंग मास्टर ट्रेनर समितीमधील २० ते २५ शिक्षक , ३ एनजीओ प्रतिनिधी, व प्राथमिक शिक्षण विभागातील १ कर्मचारी असे ३० अधिकारी कर्मचारी अभ्यास दौऱ्यात सहभागी होणार आहे.
या प्रकल्पासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेनुसार एका नवीन समितीची स्थापना करण्यात येणार असून २० ते २५ शिक्षकांची निवड एसइइ लर्निंग मास्टर ट्रेनर म्हणून सहाय्यक आयुक्त , शिक्षण विभाग यांच्या नियंत्रणाखाली समितीची निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. या ६ दिवसाच्या अभ्यासदौऱ्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती सभेत मान्यता दिली.