न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२५) :- धुळवड साजरी केल्यानंतर इंद्रायणी नदीत पोहायला गेलेल्या तीन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १४) दुपारी साडेचारच्या सुमारास किन्हई गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीत घडली. गौतम कांबळे (२४), राजदीप आचमे (२५) आणि आकाश विठ्ठल गोरडे (२४, सर्व रा. घरकुल, चिखली) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरकुल परिसरातील चार ते पाच तरुण धुळवड साजरी करण्यासाठी किन्हई गावात गेले होते. तेथील इंद्रायणी नदीच्या पात्रात ते पोहण्यासाठी उतरले; मात्र पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने तिघेजण बुडाले. अन्य मित्रांनी मोठ्याने आरडाओरड केल्यानंतर स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने शोधकार्य हाती घेण्यात आले. काही वेळाच्या शोधानंतर तिन्ही तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठीवायसीएम रुग्णालयात पाठवले. या घटनेची देहूरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक तपास केला जाईल असे देहूरोडचे वरिष्ठ निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले.















