न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. १६ मार्च २०२५) :- पीएमपीएमएलने भोसरी ते महाळुंगे एमआयडीसी या बस मार्गाचा विस्तार करत पिंपरी ते महाळुंगे एमआयडीसी, एन्ड्युरन्स कंपनी असा नवा बसमार्ग सुरू करण्यात आला आहे. येत्या मंगळवारपासून (दि. १८) प्रायोगिक तत्वावर या मार्गावर बससेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती पीएमपीएमएल सुत्रांनी दिली.
पीएमपीएमएलच्या पिंपरी डेपोअंतर्गत भोसरी ते महाळुंगे एमआयडीसी (मार्ग क्र. १२०) या बससेवेचा विस्तार करण्यात आला आहे. दर अर्धा तासानंतर ही बस मार्गावर सोडली जाणार आहे. पहाटे सव्वा पाच वाजता पहिली बस पिंपरी रोडवरून सुटणार आहे. तर, शेवटची बस रात्री पावणे दहा वाजता सुटेल.
पिंपरी रोड, नेहरूनगर, लांडेवाडी, भोसरी, गंधर्वनगर, मोशी, चाकण तळेगाव चौक, ल्युमॅक्स कंपनी, महाळुंगे फाटा चौकमार्गे ही बस एनड्युरन्स कंपनी, महाळुंगे येथे पोहोचेल. या बस प्रवासाकरिता १२ वर्षापुढील प्रवाशाला ३५ रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे.