न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२५) :- पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ३५ हुन अधिक रस्त्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे. त्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून, यामुळे वाहतूक व्यवस्था सुधारेल. तसेच, पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि आयटीनगरीचा वाहतुकीचा ताण कमी होऊन कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. यातील सर्वाधिक रस्ते पुरंदर, मुळशी आणि हवेली तालुक्यात होणार आहे. यासाठी अंदाजे ९३ कोटी खर्च करण्यात येणार आहे.
‘पीएमआरडीए’कडून या ठिकाणी रस्त्याची कामे झाल्याने त्याचा गावातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यात मदत होणार आहे. तालुक्यांमधून हे रस्ते जोडण्यात येणार आहेत, यामध्ये खेड, शिरूर, मावळ, मुळशी आदी तालुक्यांचा समावेश आहे. खेड तालुक्यात चार, शिरूर, मावळ आणि
मुळशीमध्ये प्रत्येकी दोन ‘मिसिंग लिंक’ होणार आहेत. यासाठी ८५७.५९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जिल्हाधिका-यांच्या मंजुरीनंतर कार्यवाही वेगाने होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, मावळ भागात कामशेत ते कुसगाव, गोडुंबरे ते साळुंबरे, शिरगाव ते गहुंजे आणि इंदोरी रसाळ चीक या ठिकाणी रस्त्याची कामे होणार आहेत.
या ठिकाणी असणारे रस्ते अरुंद असल्याने तसेच, काही रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हे मार्ग पुणे-मुंबई महामार्गानजीक असल्याने शहरातील होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. त्याचप्रमाणे खेड तालुक्यात ५ वेगवेगळ्या ठिकाणी कामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने धामणे फाटा ते जिल्हा परिषद स्कूल कोये, कोइदे फाटा ते कडूस गावठाण कडूस ते किवळे भोसे ते वडगाव घेणंद या मार्गावरती कामे करण्यात येणार आहेत. या कामास तब्बल १५ कोटी रुपये खर्च होणार आहेत
त्याचप्रमाणे सर्वाधिक रस्ते हे पुरंदर तालुक्यामध्ये होणार असून, कनेक्टिव्हिटी नियोजित विमानतळाच्या अनुषंगाने तालुक्यामध्ये रस्त्याच्या कामाबाबत भर देण्यात आला आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गावर रस्ते तयार करण्यात येणार आहेत. त्यात सोमुर्डी, केतकावळे, मिसाळवाडी, नारायणगाव, बनपुरी रोड, खेड शिवापुर, कुंभारवलम् त्याचप्रमाणे सासवड ते सुपे या महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नियोजित विमानतळ आणि एमआयडीसी कंपन्यांना दळवळणाची सुविधा व्हावी यासाठी, कामे करण्यात येणार आहे. याचप्रमाणे मुळशीमध्ये कुळे गावठाण, पुनावळे जांभे, दत्तवाडी, आंबेगाव, लवळे आणि पौड या ठिकाणी लोकवस्ती वाढत आहे. मात्र, या परिसरामध्ये रस्ता उपलब्ध नसल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते. आयटीनगरीमधील वाहतूककोंडी सुटणार..
बालेवाडी स्टेडियमजवळून जाणाऱ्या मिसिंग लिंकमुळे सुस-बाणेर, तसेच चांदणी चौकाकडून येणारी वाहने म्हाळुंगेतून हिंजवडी फेज-एक, दोन आणि तीनकडे वळविण्यात येणार आहे. त्यामुळे वाकड येथील छत्रपती चौक, हिंजवडीतील काही भागांत होणारी वाहतूककोंडी टळणार आहे. तर, देहु-येलवाडी ‘मसिंग लिंक’मुळे चाकण-शिक्रापूर रस्त्यावरून थेट पिंपरी-चिंचवडला जोडण्याचा मार्ग उपलब्ध होईल.














