- घरमालक आणि भाडेकरू यांची माहिती आता थेट पोलिसांकडे जमा होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२५) :- ऑनलाइन भाडेकरारातील नवीन प्रणालीनुसार घरमालक आणि भाडेकरू यांची माहिती आता थेट पोलिसांकडे जमा होणार आहे. त्यामुळे भाडेकरू ठेवल्याची माहिती पोलिस ठाण्यांत समक्ष जाऊन देण्याची गरज उरणार नाही.
भाडेकरार २.० ही प्रणाली पुणे जिल्ह्यात १७ फेब्रुवारीपासून सुरू केल्यानंतर आता १ एप्रिलपासून पुणे शहर व मुंबईत ही प्रणाली लागू करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील एकूण ८७ पोलिस ठाणे या प्रणालीशी जोडण्यात आली आहेत. हा भाडेकरार आता मराठीतून उपलब्ध करून दिला आहे.
अवैधरीत्या भाड्याने राहणाऱ्यांवर वचक राहावा, म्हणून अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी दिलेल्या आदेश दिले होते. त्यात ई-नोंदणी कागदपत्रांसह भाडेकरूंची नावे, पत्ता, छायाचित्रे, दोन व्यक्तींचे संदर्भ सादर करावे लागते. ऑनलाइनमुळे घरमालक व भाडेकरूंचे पोलिस ठाण्याचे हेलपाटे वाचणार आहेत.
पोलिस ठाण्यांच्या सीसीटीएनएसशी भाडेकरार जोडण्यात आले आहेत. त्यामुळे भाडेकरार पूर्ण झाल्यानंतर त्याची ऑनलाइन प्रत संबंधित ठाण्यात पोहोचविली जाईल. पुण्यात ३३, पिंपरीत १७, तर जिल्ह्यात ३७ पोलिस ठाणे असून, हे सर्व ८७ ठाणे या प्रणालीशी जोडले आहेत. त्यामुळे नागरिकांना ठाण्यांमध्ये समक्ष भेट देण्याची गरज नाही. ही प्रणाली एप्रिलअखेर राज्यभर सुरू केले जाईल, सर्व १,१३४ पोलिस ठाणे या प्रणालीशी जोडली आहेत.
पोलिस ठाणे सीसीटीएनएस प्रणालीशी जोडल्याने भाडेकरार थेट पोलिसांकडे जमा होईल. त्यामुळे नागरिकांना पोलिस ठाण्यात जाण्याची आवश्यकता नाही. एप्रिलअखेर ही प्रणाली राज्यभर लागू करण्यात येईल.
अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक…
या प्रणालीत भाडेकरार मराठीत उपलब्ध करून दिला आहे. भाडेकरारासाठीचे शुल्क भरण्यासाठी क्यूआर कोडद्वारे ‘पे टू आयजीआर’ या प्रणालीचा वापर करता येणार आहे. पक्षकारांचे आधार क्रमांक यात टाकल्यानंतर त्यांची सबंध माहिती आधार पोर्टलवरूनच मिळविली जाणार आहे. यातून फसवणुकीचे प्रकार टळणार आहेत. यामुळे पक्षकारांनाही फसवणुकीचे प्रकार टाळता येतील.

















