न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२५) :- महापालिकेच्या चिंचवडगाव येथील तालेरा रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील आवश्यक स्थापत्यविषयक कामांमध्ये बर्न वॉर्डच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे.
त्यानुसार, या कामासाठी सुधारित ६ कोटी ५० लाख रुपये इतक्या खर्चास मंगळवारी महापालिका सर्वसाधारण सभेची सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्यात आली.
शहरामध्ये जळीत रुग्णांसाठी सध्या महापालिका रुग्णालयात सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससुन रुग्णालयात पाठवावे लागते. महापालिकेच्या रुग्णालयात बर्न वॉर्ड सुरु होणे गरजेचे आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी संयुक्त पाहणी करून चिंचवडगाव येथील जुन्या तालेरा रुग्णालयाच्या इमारतीत बर्न वॉर्ड सुरु करण्याचे नियोजन केलेले आहे. या कामासाठी वास्तुविशारदांनी इमारतीच्या आराखड्यात अंतर्गत बदल सुचविले आहेत. या कामासाठी नव्याने निविदा काढून काम करावयाचे झाल्यास बराच कालावधी लागणार आहे. तथापि, बर्न वार्डच्या कामाची आवश्यकता आणि निकड लक्षात घेता नवीन तालेरा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये आवश्यक स्थापत्यविषयक कामे सोपविलेल्या ठेकेदारालाच हे काम सोपविण्यात येणार आहे.
संबंधित ठेकेदाराने हे काम सध्याच्या निविदा दरानुसार करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे बर्न वॉर्डच्या कामाचा अंतर्भाव करून ६ कोटी ५० लाखांचा सुधारित खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता प्रशासक तथा आयुक्त सिंह यांनी दिली आहे.

















