न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२५) :- पुणे जिल्हा परिषद मुख्यालयात मंगळवारी (दि. २५) चक्क खऱ्या चलनी नोटांची मनसोक्त उधळण पाहायला मिळाली. मावळ तालुक्यातील खडकाळा ग्रामपंचायतीचा कर्मचारी अनिल शिरसाट याने नोकरभरतीत जिल्हा परिषदेने त्याच्यावर अन्याय केल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या आवारात मोकळ्या जागेत नोटा उधळल्या. या नोटा उधळत असताना त्याने गळ्यात नोटांचा हारही घातला होता.
उधळण्यात आलेल्यामध्ये दहा आणि वीस रुपयांच्या नोटांची संख्या मोठी होती. या घटनेने जिल्हा परिषद मुख्यालयात काही काळ मोठी खळबळ उडाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ऐन उन्हाळ्यात नोटांचा पाऊस झाल्याचे सांगितले.
मावळ तालुक्यातील खडकाळा ग्रामपंचायतीचे ते कर्मचारी असून, अनिल शिरसाट असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. नोटा उधळल्यानंतर काही काळ शिरसाठ हे आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते. दरम्यान, दुपारी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. जिल्हा परिषदेच्या नोकरी भरतीत एकूण रिक्त जागांपैकी १० टक्के जागा या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. या राखीव जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात येतात. यानुसार या कर्मचाऱ्याचा सेवाज्येष्ठता यादीत ३४ वा क्रमांक आहे. मात्र या नोकरभरतीत सन २०२१-२२ या वर्षात अन्याय झाल्याचा आरोप शिरसाट यांनी आंदोलन करताना केला.
खडकाळा (ता. मावळ) ग्रामपंचायतीचे कर्मचारी अनिल शिरसाट यांनी सन २०२१-२२ या नोकरभरती वर्षात ग्रामपंचायत कर्मचारी कोट्यातून भरल्या जाणाऱ्या भरतीत त्यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलन केले आहे. शिवाय या मागणीसाठी त्यांनी मंत्रालयातही आंदोलन केले आहे. नियम डावलून नोकरभरती करता येत नाही. अपात्र असूनही नियुक्ती मिळण्यासाठी दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
– विजयसिंह नलावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद…











