- शंभर टक्के थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट केवळ कागदावरच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२५) :- महापालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करत शंभर टक्के थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट समोर ठेवून वसुली मोहीम सुरू केली. यात अग्निशामक, आकाशचिन्ह विभागाने विक्रमी वसुली केली, तर करसंकलन आणि बांधकाम विभागाला उद्दिष्ट गाठता आले नाही. यंदाही शंभर टक्के थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट केवळ स्वप्नच ठरले आहे.
जकात, एलबीटी बंद झाल्याने महापालिकेसमोर उत्पन्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मालमत्ताकर आणि विविध विभागांचे परवानगी शुल्क हेच आता प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे; परंतु मालमत्ताधारकांनी थकवलेल्या कोट्यवधीच्या वसुलीचा प्रश्न जटिल झाला आहे. असे असले तरी थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने कंबर कसली होती.
मार्च २०२५ अखेर शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट समोर ठेवून मोहीम सुरू केली. त्यासाठी थकबाकीदारांना जप्ती नोटिसा देण्यात आल्या, नळजोडण्या तोडण्यात आल्या, वेबसाईटवर नावे प्रसिद्ध करण्यात आली, मोबाईलवर संदेश पाठवण्यात आले. एवढी उठाठेव करूनही करसंकलन विभागाला १०७५ कोटींचे उद्दिष्ट गाठता आले नाही.
महापालिका प्रशासनाने एक १ लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची यादी संकेतस्थळावर जाहीर केली होती. त्यांना पाठवण्यात आलेल्या जप्तीपूर्व नोटिसांची मुदतही संपून गेली, तरी काही मोजक्या थकबाकीदारांवरच जप्तीची कारवाई केली. पीएमआरडीए तसेच मोठ्या बिल्डरांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त झाल्या, तर महापालिका प्रशासनाचे शंभर टक्के वसुलीचे स्वप्न पूर्ण झाले असते.
महापालिकेच्या अग्निशामक आणि आकाशचिन्ह विभागाने उद्दिष्ट्यपूर्तीपेक्षा वसुली जादा केली आहे. आकाशचिन्ह व परवाना विभागाचे १८ कोटी ५८ लाखांचे उद्दिष्ट होते; मात्र ते पार करत त्यांनी २० कोटी ३१ लाखांची वसुली केली आहे. अग्निशमन विभागाचे १५० कोटींचे उद्दिष्ट होते. त्यांनी १६३ कोटींची वसुली केली आहे. बांधकाम विभागाचे ९५० कोटींचे उद्दिष्ट होते. त्यांनी ९३० कोटींची वसुली केली आहे.

















