न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू आहे. नदी काठावरील सुमारे १ हजार १५० हून अधिक झाडे तोडण्याच्या वृक्ष प्राधिकरण समितीसमोरील प्रस्तावावर नागरिकांनी हरकती घेत आक्षेप नोंदविले आहेत. वृक्षतोडीत अनियमितता आणि कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
महापालिकेच्या नेहरूनगर, पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण गुलाबपुष्प उद्यानात मुळा नदी सुधार प्रकल्पातील वाकड ते सांगवी या कामातील प्रस्तावित १ हजार १५० हून अधिक झाडे तोडण्याच्या प्रस्तावावर नागरिकांची सुनावणी घेण्यात आली. उद्यान विभागाचे सहायक आयुक्त उमेश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली.
यात नदीकाठच्या सुशोभीकरण प्रकल्पातील वृक्षतोडीवर नागरिकांनी आक्षेप घेतला. सुमारे ६० ते ७० नागरिक सुनावणीसाठी उपस्थित होते. मुळा नदी सुधार प्रकल्पाचा आराखडा मंजूर झाला आहे. मुळा व पवना नदीचे पात्र अरुंद आहे. त्यामुळे नदीकाठावर सुशोभीकरणाचे काम करण्यात येत असून त्यासाठी झाडे तोडल्याचा आरोप केला जात आहे. त्यासाठी घेतलेल्या सुनावणीत नागरिकांनी याकडे वृक्ष अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. जागा मालकाची परवानगी, झाडांचे अचूक स्थान दर्शवणारा नकाशा, मोठ्या संख्येने झाडे बाधित होत असतील तर त्यांना वाचवण्यासाठी पर्यायी संकल्पचित्र, वारसा वृक्षांना (हॅरिटेज ट्री) विशेष संरक्षण, झाडांचे वय मोजण्याची वैज्ञानिक पद्धत तसेच, वन्यजीव संरक्षण कायदा आणि वेटलॅण्ड कायद्याचे उल्लंघन आदी मुद्दे नागरिकांनी सुनावणीत मांडले.
नदी सुधारच्या कामामध्ये कमी झाडे तोडली जाणार आहेत. त्यासाठी आराखड्यात तसे बदल केले आहेत. नव्याने हजारो झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच झाडांचे पुनरोपण देखील करण्यात येणार आहे. विनापरवाना झाडे तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यातील दोषींवर कारवाई करणार आहोत.
– शेखर सिंह, आयुक्त…

















