- रेडिरेकनर दरात ६.६९ टक्के इतकी वाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०१ एप्रिल २०२५) :- आगामी आर्थिक वर्षासाठी (२०२५-२६) राज्य शासनाकडून वार्षिक बाजारमूल्य दरात (रेडिरेकनर) दरात सोमवारी वाढ करण्यात आली. गेल्या दोन वर्षांनंतर प्रथमच ही वाढ करण्यात आली असून, सरासरी ही वाढ ४.३९ टक्के करण्यात आली आहे. पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडमधील दर चढे असून रेडिरेकनरच्या दरात पुण्यात ४.१६ टक्के तर, पिंपरी चिंचवडमध्ये ६.६९ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे.
राज्यातील महापालिकांच्या क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे ५.९५ टक्के वाढ करण्यात आली असून, ग्रामीण भागात ३.३६ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीची अंमलबजावणी आज, मंगळवार (१ एप्रिल) पासून राज्यभरात होणार आहे. त्यामुळे महापालिकांच्या हद्दीतील सदनिका आणि जमिनींच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे.
राज्यात दर वर्षी एक एप्रिलला रेडी रेकनरचे नव्याने दर लागू होतात. या दरानुसार त्या रकमेवर नागरिकांना मुद्रांक शुल्क भरावे लागते. तसेच, नोंदणी आणि मुद्रांक विभागाने तयार केलेले जमीन, सदनिकांचे दर इतर विभागही ग्राह्य धरतात. गेल्या दोन वर्षात राज्य सरकारकडून रेडीरेनकरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे यंदा रेडीरेकनरमधील दरात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे ही वाढ किती असेल, याबाबत उत्सुकता होती.
राज्यातील ग्रामीण क्षेत्रात ३.३६ वाढ करण्यात आली असून नगरपरिषद आणि नगर पंचायत क्षेत्रात ४.९७ टक्के, महापालिका क्षेत्रात (मुंबई वगळता) ५.९५ टक्के एवढी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याची (मुंबई वगळता) सरासरी वाढ ४.३९ टक्के एवढी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
महापालिका, तसेच नगरपालिका ह्द्दीलगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत आहे, अशा शहरालगतच्या गावांचा समावेश प्रभाव क्षेत्रात करण्यात आला असून तिथे ३.२९ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. तर बृहमुंबई महापालिकेच्या कार्यक्षात मात्र ३.३९ टक्के वाढ करण्यात आली आहे.