न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- उष्णतेच्या लाटेचे पुन्हा एकदा आगमन झाल्याने नागरिकांची लाही-लाही होत आहे. तर, शहरातील रस्त्यांवर दुपारच्या वेळी कर्फ्यूसारखे वातावरण दिसत आहे. पुणे वेधशाळेने सोमवारी ४१.३ अंश सेल्सियस इतक्या कमाल तापमानाची नोंद केली आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेट वेदरने देखील सोमवारी दुपारच्या वेळी पिंपरी चिंचवड शहराचे कमाल तापमान ४१ अंश असल्याचे दर्शविले होते.
पुढील काही दिवस उष्णतेची लाट अशीच कायम राहणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. २२ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असून पुढील संपूर्ण आठवडा कमाल तापमानाच्या बाबतीत ४१ ते ४० अंशांच्या दरम्यान राहणार आहे. कमाल आणि किमान तापमानात सुमारे दुपटीचे अंतर पहायला मिळत आहे.
सोमवारी सकाळी नोंदवलेल्या आकड्यानुसार गेल्या २४ तासांमध्ये किमान तापमान २१.१ अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले होते. वेधशाळेच्या शक्यतेनुसार २४ मे पर्यंत कमाल तापमान ४१ अंश सेल्सियस राहणार आहे.











