- राजकीय दबावामुळे विकास कामांसाठी कर्ज काढण्याचा घाट?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मोशी येथे ७०० बेडच्या मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाचे बांधकाम काम सुरू आहे. त्यासाठी तसेच, टेल्को रस्त्यावर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार सुशोभीकरण करण्यासाठी महापालिका एकूण ५५० कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे.
कर्ज घेण्याचा हा प्रस्ताव रद्द केला नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. श्रीमंत असूनही महापालिका कर्ज घेत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महापालिकेने २८ जुलै २०२३ रोजी नदीसुधार योजनेसाठी २०० कोटी रूपयांचे कर्ज म्युन्सिपल बॉण्डद्वारे घेतले आहे. ती रक्कम मुळा नदीसुधार प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील कामासाठी वापरली जात आहे. तसेच, प्राधिकरण, निगडी येथे हरित सेतू प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिका ग्रीन बॉण्ड काढून २०० कोटींचे नवीन कर्ज घेणार होते. मात्र, आता ग्रीन बॉण्डद्वारे कर्ज गवळीमाथा चौक ते इंद्रायणीनगर चौकापर्यंतच्या हरित सेतू प्रकल्पासाठी काढण्यात येत आहे.
मोशी रुग्णालय आणि १३ किलोमीटर अंतराच्या टेल्को रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी एकूण ५५० कोटी रुपयांचे कर्ज बँकेद्वारे घेण्यात येणार होते. नंतर त्या कर्जाची आवश्यकता नसल्याने तो प्रस्ताव बारगळला होता. मात्र, सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ५५० कोटी रुपयांचे कर्ज काढणार असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
त्यासंदर्भात राज्य शासनाच मुख्य सचिवांनी अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त), अतिरिक्त मुख्य सचिव (नगर विकास विभाग) यांच्यासह आयएफसीच्या अधिकार्यांची बैठक घेतली. या दोन कामांना आयएफसीने महापालिकेस ५५० कोटी रुपयांचे कर्ज द्यावे, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, नाशिक फाटा, कासारवाडी येथील जेआरडी टाटा दुमजली उड्डाण पुलासाठी महापालिकेने १५९ कोटी ११ लाख रूपयांचे कर्ज जानेवारी २०१५ ला जागतिक बँकेकडून घेतले होते. ते कर्ज महापालिका अद्याप डॉलरमध्ये फेडत आहे. कर्ज फेडण्याची मुदत जानेवारी २०३९ पर्यंत आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा महापालिका बँकेकडून असे ५५० कोटी रुपयांचे कर्ज घेत आहे. महापालिका आर्थिक सक्षम आहे. अशी स्थिती असताना कर्ज घेतले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केवळ राजकीय दबावामुळे कर्ज काढण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.












