न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२५) :- लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. ही घटना बार्शी रोडजवळील शासकीय निवासस्थानी घडली असून, त्यावेळी सुरक्षारक्षकासह परिवारातील सदस्यांनी मनोहरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, व्हेंटिलेटवर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मनोहरे यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा नेमके काय घडले, याचा पोलिस तपास करीत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार त्यांनी स्वतःच डोक्यात गोळी झाडल्याचे दिसून येत आहे, असे पोलिस म्हणाले. मनोहरे यांनी २० ऑक्टोबर २०२२ रोजी लातूर महापालिकेत पदभार स्वीकारला होता. आयुक्त आणि प्रशासक असल्याने संपूर्ण कारभार तेच पाहत होते. २७ मार्च रोजी त्यांनी मनपाचा अर्थसंकल्प सादर केला. हा प्रकार घडला त्यावेळी निवासस्थानी पत्नी आणि दोन्ही लहान मुले होती.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉ. वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याशी संपर्क साधून आयुक्तांच्या प्रकृतीची विचारपूस करून घटनेची माहिती घेतली. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक मुंडे, महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले होते. घटना ११.१५ वाजता घडली. त्यानंतर अगदी कमी वेळात कुटुंबीय तसेच सुरक्षा रक्षकांनी आयुक्तांना रूग्णालयात आणल्याने तत्पर उपचार सुरू झाले.