न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२५) :- महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाच्या वतीने आकुर्डी येथील धर्मराज चौक ते इस्कॉन मंदिरापर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल ८ कोटी ३० लाख ४४ हजार ८०८ रूपये खर्च करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यांवर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार रस्त्याची रूंदी कमी करून पदपथ, सायकल ट्रॅक तयार करण्यात येत आहेत. तसेच, सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून, पदपथ व सायकल ट्रॅकवर अतिक्रमण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाकडून शहरातील विविध रस्त्यांवर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार कामे काढली जात आहेत.
स्थापत्य प्रकल्प विभागाने आकुर्डीतील धर्मराज चौक ते इस्कॉन मंदिरापर्यंतच्या रस्त्याची ११ कोटी १५ लाख ४१ हजार ३७८ रूपये खर्चाची निविदा १२ ऑक्टोबर २०२४ ला काढली होती. त्यासाठी ४ ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्या सर्व ठेकेदारांचे १७ ते २६ टक्के कमी दरांच्या निविदा पात्र ठरल्या. त्यातील २५.९९ टक्के कमी दराची एकूण ८ कोटी ३० लाख ४४ हजार रूपये खर्चाची पीसीसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या ठेकेदाराची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. दर कमी असल्याने संबंधित ठेकेदाराकडून ३ कोटी १३ लाख ५ हजार रूपयांची अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम जमा करून घेण्यात आली आहे. या कामाच्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. दरम्यान, या रस्त्यांवर स्वतंत्रपणे पदपथ व सायकल ट्रॅक करणे, सुशोभिकरण करणे ही कामे केली जाणार आहे. या कामाची मुदत २ वर्षे आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.














