- पालकांनो थोडी-थोडी तरी फी भरणा करा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर. २०२०) :- लॉकडाऊनमुळे खासगी शैक्षणिक संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या ‘ फी ‘ थकबाकीमुळे शाळा कशा सुरू ठेवायच्या आणि शिक्षकांचे पगार कसे करायचे? मालमत्तेची देखभाल कशी करायची? असे अनेक प्रश्न शाळा व्यवसायिकांसमोर उभे आहेत.
पिंपरी – चिंचवड शहरात हजारोंच्या संख्येने खासगी संस्था आहेत. यापैकी काही स्वत : च्या मालकीच्या जागेवर तर काही भाडेतत्ववावर इमारती बांधून सुरु आहेत. ऑनलाइन शाळा सुरु असल्यामुळे इमारतीची देखभाल, साफसफाई, वीजबिल, पाणी बिल हे सर्व खर्च सुरुच आहेत. त्यात भर म्हणजे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याकरिता संगणक, इंटरनेट, प्रत्येक वर्ग सॅनिटराईज करणे हे खर्च वाढले आहेत.
पालकांच्या मागणीनुसार आम्ही ऑनलाइन वर्ग सुरु केले आहेत. वर्गाचे शिक्षक वेळापत्रकानुसार शिकवीत आहेत. मात्र पालक फी भरत नाही. शिक्षकांचा पगार व शाळेचा खर्च, पालक फी भरण्यास मागेपुढे पहात आहेत. जर फी जमा होणार नसेल, तर शाळेचा खर्च व शिक्षकांचा पगार कशाने करायचा, हा खरा आमच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक शिक्षकांना इंटरनेट सेवा पुरवावी लागत आहे. अनेक बाबी आहेत की त्यासाठी पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे पालकांनी हप्त्याने फी जमा करणे गरजेचे आहे. असेच काही दिवस सुरु राहिले तर शैक्षणिक संस्था बंद पडतील. – अरुण चाबुकस्वार – संस्थापक, न्यू सिटी प्राईड इंग्लिश स्कूल..
सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. त्यासाठी कोणत्याही पालकाना फीसाठी तगादा लावला जात नाही. परंतु, जर शिक्षकांना पगार मिळाला नाही, तर ते कसे शिकविणार, त्यांना प्रपंच चालवण्यासाठी काही तरी करावेच लागेल. पालकांनी थोडी-थोडी करुन का होईना फी जमा करण्यास हरकत नाही. – जगन्नाथ काटे – संस्थापक, पी . के . स्कूल….