- खुनातील फरार आरोपीच्या आवळणार मुसक्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जानेवारी २०२१) :- चिंचवड येथील वाल्हेकरवाडीमध्ये शनिवारी (दि. ९) मायलेकांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासाकरिता चार पथके रवाना करण्यात आली आहेत. सुमैय्या नासीर शेख (वय ४१) आणि आयान (४, दोघेही रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी त्यांची नावे आहेत.
नोमान ऊर्फ सोमेश्वर काळे (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मयत सुमैय्या यांच्या मुलीने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमैय्या आणि आयान यांचा आरोपी काळे याने खून केल्याचे उघडकीस आले.
घटनेनंतर काळे हा फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखा युनिट दोनचे एक पथक खोली भाड्याने घेणारा तरुण शंकर वाकडे याच्या गावी लातूर येथे गेले. मात्र, तो दोन महिन्यांपासून गावीच असल्याचे तपासात पुढे आले.