न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रु.) :- पाटबंधारे खात्याच्या सूचनेनंतरही महापालिकेने जास्तीचा पाणी उपसा सुरू ठेवल्याने पिंपरी-चिंचवडकरांना आता १० टक्क्यांऐवजी १८ टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. पाणी कपातीचा निर्णय आणखी लांबल्यास कपात वाढवावी लागणार आहे.
धरणातील पाणी पातळीत झपाट्याने घट होत असून, पाणी साठा निम्म्यावर आला आहे. ५ जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा आज उपलब्ध आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने ४४० एमएलडी पाणी उपसा करून, पाणी काटकसरीने वापरण्याचा सूचना पाटबंधारे खात्याने केल्या आहेत. मात्र, पाणी कपातीबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याने महापालिकेकडून अद्यापही ५०० एमएलडी पाणी उपसा सुरू आहे.