- नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेला २४ मार्चपासून सुरुवात
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च) :- वाको इंडिया यांच्या वतीने आणि अमॅच्युर स्पोर्टस् किंक बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने ‘राष्ट्रीय किक बॉक्सिंग फेडरेशन चषक २०१९’ या स्पर्धेचे आयोजन २४ मार्च पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे करण्यात आले आहे. सदर स्पर्धा २८ मार्चप्रर्यंत चालणार असून, या स्पर्धेत देशातील २७ राज्य आणि ७ केंद्रशासित प्रदेश यामधील संघ सहभागी होणार आहेत. अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन पुण्यामध्ये प्रथमच होत असल्याचे या स्पर्धेचे आयोजक व असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष म्हात्रे व चेअरमन संतोष बारणे यांनी सांगितले.
प्रथमच पुण्यातील अमॅच्युर स्पोर्टस् किक बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र (वाको महाराष्ट्र) संघटनेला या स्पर्धा घेण्याचा प्रथमच बहुमान मिळाला आहे. देशातील अनेक कानाकोपर्यातून २ हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तर यात यजमान महाराष्ट्र संघातील ३०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सदर कार्यकार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा २४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. सदर स्पर्धा या वर्ल्ड असोसिएशन ऑफ किक बॉक्सिंग ऑगर्नायजेशनच्या नियमावलीनुसार घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये पॉईंट फाईट, लाईट कॉन्टॅक्ट, किक लाईट, फुल कॉनटॅक्ट, लो-किक, के-वन आणि म्युजिकल फॉर्मस् आदि क्रीडा प्रकारांचा समावेश असणार आहे.
४३७ वजनगटामध्ये १७४८ पदकांसाठी २००० खेळाडू आपली प्रतिभा दाखविणार आहेत. त्याचबरोबर त्यांचे नशिब पणाला लागणार असून, सदर स्पर्धा या कॅडेट, ज्युनिअर व सबज्युनिअर मुले आणि मुलीसाठी असतील. तसेच पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी सीनिअर वयोगट असणार आहे.
या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अमॅच्युर स्पोर्ट्स किंकबॉक्सिंग असोसिएशन वाको महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष म्हात्रे व चेअरमन संतोष बारणे हे प्रयत्न करत आहेत.