- उपचाराआधीच रुग्णांकडून अॅडव्हान्सची मागणी केल्यास परवान्यावर येणार टाच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२५) :- दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये महिलेला ऑपरेशन करण्यापूर्वी १० लाखांची मागणी करण्यात आली. यामुळे रुग्णाच्या मानसिकतेवर परिणाम होत असून पैसे उपलब्ध होईपर्यंत उपचार करण्यासही दिरंगाई केली जाते. यामुळे आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे कोणत्याच खासगी रुग्णालयाने रुग्णाकडून अनामत रकमेची मागणी करू नये, तसेच मागणी केल्यास परवाने रद्द करण्यात येईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून देण्यात आला आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारापूर्वी अनामत रकमेसाठी मुजोरी दाखवली आणि तनीषा भिसे या महिला रुग्णाचा बळी गेला. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने ६५० रुग्णालयांना नोटिसा धाडल्या आहेत. कोणत्याच रुग्णांकडून अनामत रक्कम घेऊ नका, असे घडल्यास परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा महापालिकेने या नोटिसीद्वारे दिला आहे.
शहरातील ६५० नोंदणीकृत रुग्णालयांना अनामत रक्कम न घेण्याबाबत परिपत्रक काढले आहे. रुग्णालयामध्ये येणाऱ्या तात्काळ उपचारासाठी जे रुग्ण येतील त्यांच्यावर पहिल्यांदा तप्तरतेने उपचार करणे आवश्यक आहे. बाकी इतर सर्व गोष्टी नंतर बघता येतील.
महापालिकेकडून रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे या कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाईचा समावेश आहे. पुन्हा पुन्हा त्याच चुका होत असतील, तर परवानाही रद्द करण्यात येणार आहे, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.












