न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी (१४ एप्रिल) दिव्यांग कलाकारांचा सहभाग असलेला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा नृत्य संगीतमय विश्वातील अविस्मरणीय कलाविष्कार ‘ट्रिब्यूट टू डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध थेरप्युटिक थिएटर दिग्दर्शक डॉ. सय्यद सलाहुद्दीन पाशा यांच्या ‘मिरॅकल ऑन व्हील्स’ या संस्थेच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दिग्गज दिव्यांग कलाकारांचा समावेश होता. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) ॲड. गोरक्ष लोखंडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसदस्य, महापालिका कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रेक्षकांकडून मिळाले ‘स्टँडिंग ओव्हेशन’…
दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून ‘स्टँडिंग ओव्हेशन’ मिळाले. प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांची दाद देत उभे राहून कलाकारांचे कौतुक केले. कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांनी कलाकारांसोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. ‘ट्रिब्यूट टू डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स’ हा कार्यक्रम अविश्वसनीय, अविस्मरणीय असाच होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमुळे असा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळाल्याच्या भावनाही प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात आल्या.