न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाकडून पदपथावर लावलेल्या झाडांच्या फांद्या सर्रासपणे तोडल्या जातात. याबाबत अनेकदा स्थानिकांकडून तक्रार करुनही कारवाई होत नाही. होर्डिंगवर जाहिरात, दुकानांचे फलक दिसण्यासाठी अनेकदा झाड तोडून टाकणे, केवळ खोड ठेवून झाडांचा सर्व विस्तार काढून टाकण्याचा प्रकार शहरात सर्रास घडत आहे. चऱ्होली, वडमुखवाडी, देहू – आळंदी रस्त्यावर नुकतेच असे प्रकार घडले आहेत. शहरातील धोकादायक झाडे काढणे, त्यांची छाटणी करण्यासाठी महापालिका वृक्षसंवर्धन समितीची परवानगी आवश्यक असते.
विनापरवाना झाड कापणे, झाडांची छाटणी केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. वृक्ष प्राधिकरण समितीने दंडाच्या रकमेत दहापट वाढ केली आहे. तरीही छाटणीच्या नावाखाली जाहिरातींचे होर्डिंग दिसावे, दुकानांचे फलक दिसावेत यासाठी हे प्रकार सुरुच आहेत.
याबाबत उद्यान व वृक्ष संवर्धन विभागास विनापरवाना वृक्षतोडीच्या सारथीवर तक्रार प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारीनुसार त्या जागेवर पंचनामा करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित सर्व जाहिरातदारांचा परवाना रद्द करावा, असे पत्र उद्यान विभागाकडून आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे दिला आहे.