न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२५) :- पिंपरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकास ३० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. १५) मोहननगर चौकीत ही कारवाई केली. निलेश रमेश बोकेफोडे (३८), असे अटक करण्यात आलेल्या फौजदाराचे नाव असून, ते सध्या पिंपरी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.
दरम्यान, त्यांनी एका तक्रारदाराकडे गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले वाहन परत मिळवून देण्यासाठी आणि संबंधित गुन्ह्यात पुढील कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने ही मागणी अमान्य करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार, पुणे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी खात्री करून ११ व १२ एप्रिल २०२५ रोजी सापळा रचला. या सापळ्या दरम्यान मंगळवारी उपनिरीक्षक बोकेफोडे यांना तक्रारदाराकडून ३० हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.












