न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२५) :- चिंचवडगाव येथील क्रांतिवीर चापेकर वाडा स्मारकाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी (दि. १८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी महापालिकेकडून नियोजन सुरू आहे. त्याअनुषंगाने कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी अधिकारी गुंतले आहेत.
क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या चिंचवडगाव येथील चापेकर वाड्याचे स्मारकात रुपांतर होत आहे. क्रांतिवर चापेकर स्मारक समिती व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने हे स्मारक होत आहे. या वास्तूंमध्ये राष्ट्रीय संग्रहालय होत असून ऐतिहासिक, तसेच स्वातंत्र्य समरातील विविध वास्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे.
या स्मारकाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी दहा वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी महापालिकेची जय्यत तयारी सुरू आहे. तयारीविषयीच्या सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि. १५) दिल्या आहेत. यामध्ये हुतात्मा चापेकर स्मारक, समरसता गुरुकुलम, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेश्रागृह येथे कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शहर अभियंत्यासह विविध अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.












