न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२५) :- चऱ्होली येथील खासगी शाळेने केलेली अवाजवी शुल्कवाढ आणि शालेय साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याच्या लादलेल्या निर्बंधाविरोधात पालकांच्या वतीने मंगळवारी (दि. १५) शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले.
पालकांनी निदर्शन करण्यास सुरुवात केल्यानंतर शाळा प्रशासनाने पालक संघाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले. त्यानंतर काही प्रमुख मागण्या प्रशासनाने मान्य केल्या. त्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले.
याबाबत पालकांनी दिघी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिलेला होता. त्यामुळे शाळेमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शाळा प्रशासनाने शैक्षणिक शुल्कात जवळपास १० टक्के वाढ केली होती. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांना लागणार्या शालेय वस्तूंचे दर अवाजवी लावून संबंधित शाळेतूनच खरेदी करण्याचे निर्बंध लावले होते. मात्र, पालकांच्या विरोधानंतर शाळा प्रशासनाने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ५ टक्केच शुल्क वाढ करण्यात येईल, असे लेखी पत्र पालक संघाला दिले. त्याशिवाय, वह्या, बॅग आणि बूट शाळेतूनच घेण्याचे निर्बंध हटविण्यात आले. हे साहित्य विद्यार्थी बाहेरील दुकानातून घेऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पालकांसमवेत माजी महापौर नितीन काळजे, सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर, कुणाल तापकीर तसेच, पालक संघाच्या समितीचे सदस्य उपस्थित होते.












