- काळ्या फिती लावुनही महायुती सरकारला येईना जाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२५) :- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेची ८ रुग्णालये आणि ३२ दवाखाने तसेच सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात मानधन तत्त्वावर कार्यरत असलेले डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारी यांचा तीन महिन्यांचा पगार प्रलंबित आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे गेल्या ७ दिवसांपासून काळ्या फिती लावून काम सुरू आहे.
दरम्यान (दि. १५) आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मागण्या मांडल्या.
महापालिकेची ८ रुग्णालये आणि ३२ दवाखान्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत एकूण सुमारे ३५० डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपीक आणि मदतनीस कार्यरत आहेत. त्यांना मानधन तत्त्वावर नेमलेले आहे. या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मानधन राज्य सरकारमार्फत दिले जाते. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना मानधनाची रक्कम मिळालेली नाही. हीच परिस्थिती जिल्हा रुग्णालयामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत नियुक्त डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांबाबत आहे.
पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत २२०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे त्यांना विविध आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी, शासन स्तरावर अनुदानाबाबत मागणी करून प्रलंबित वेतन करण्यात यावे, असे साकडे पाटील यांना घालण्यात आले. त्याचप्रमाणे, कर्मचाऱ्यांबाबत समायोजनाचा अध्यादेश निघूनही गेल्या वर्षभरात फक्त २ पदांचे समायोजन झाले आहे. उर्वरित सर्व पदांचे समायोजन करण्यात यावे, अशीही मागणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष हर्षल रणवरे यांच्यासह शिष्टमंडळाने केली आहे.

















