- आता प्रति पान वीस ऐवजी चाळीस रूपये…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२५) :- राज्य शासनाने दस्तनोंदणी वेळी आकारण्यात येणाऱ्या दस्त हाताळणी शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागरिकांना आता प्रति पान २० रुपयांऐवजी प्रति पान ४० रुपये एवढे शुल्क भरावे लागणार आहे.
राज्य शासनाच्या नोंदणी व महानिरीक्षक यांनी केलेल्या विनंतीनुसार ही वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार हा बदल करण्यात आला असून, ही वाढ लगेचच लागू करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांनी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.
राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागात २०१२ पासून आयसरिता ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील सर्व दस्तनोंदणी कार्यालयांना डेटीकेटेड एमपीएलएस कनेक्टिव्हिटी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व दस्तनोंदणी कार्यालये नेटवर्कच्या माध्यमातून कार्यक्षम झाली आहेत. यामुळे यात संगणकीकरणाच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे.
ही सर्व यंत्रणा बांधा वापरा आणि हस्तातरीत करा, या तत्त्वावर खासगीकरणाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्यासाठी येणारा खर्च भागविण्यासाठी दस्त हाताळणी शुल्क २०१२ पासून प्रत्येक दस्ताच्या प्रत्येक पानास आकारण्यास राबविण्यास सुरुवात झाली. त्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे दस्तांच्या प्रत्येक पानास २० रुपये दस्त हाताळणी शुल्क आकारण्यास सुरुवात झाली. मात्र, गेल्या दहा ते बारा वर्षांत या शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.
मात्र, दहा ते बारा वर्षांत राज्यात दस्तनोंदणी कार्यालयांची संख्या वाढली, तसेच संगणकीकरण करणे, त्याचप्रमाणे हार्डवेअर, सॉफ्टवेअर कंझ्युमेबल्स, मनुष्यबळ याच्या खर्चात वाढ झाली. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक विभागातील खासगीकरणाच्या माध्यमातून राबविण्यात येणारा खर्च भागविण्यासाठी दस्त हाताळणी शुल्क प्रत्येक पान २० रुपये आकारण्यात येत होते. ते आता प्रत्येक पानास ४० रुपये करण्यात आले आहे.
















