- एका क्लिकवर साधा पोलिसांशी संपर्क…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२५) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नव्याने नूतनीकरण केलेल्या अधिकृत संकेतस्थळाचे लोकार्पण बुधवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, विनय कमार चौबे यांनी केले. यावेळी अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोउप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, पोउप-आयुक्त विशाल गायकवाड, परि-२ मा. पोउप-आयुक्त, स्वप्ना गोरे, परि-१, पोउप-आयुक्त, बापू बांगर, वाहतूक विभाग, पोउप-आयुक्त डॉ शिवाजी पवार, परि-३, सहा पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे (गुन्हे) आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, विनय कमार चौबे म्हणाले, मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसीय कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने नागरिकांना जास्तीत जास्त प्रशासकीय सेवा वेळेत उपलब्ध व्हावी हे या नव्या संकेतस्थळाव्दारे उद्दिष्ट आहे. लोकांच्या अधिक जवळ जाणे आणि सेवा अधिक प्रभावी करणे. या नव्या संकेतस्थळाचा जास्तीत जास्त उपयोग नागरिकांनी करावा.
या वेबसाईटमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनची माहिती, लोकेशन व पोलीस स्टेशनचे फोटो तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मोबाईल नंबरसह अपलोड केली आहे. सायबर पोलीस स्टेशनकडून महत्वाचे लिंक /संकेतस्थळे तसेच सायबर फसवणुकीबाबतचे जनजागृतीचे विविध व्हिडीओ अपलोड केले आहेत.
मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसीय कृती कार्यक्रमासाठी स्वतंत्र टॅब…
राज्य सरकारने सुरु केलेल्या १०० दिवसीय कृती कार्यक्रम अंतर्गत पोलीस विभागामार्फत करण्यात येणा-या कामगिरीचा आढावा, प्रगती व माहिती नागरिकांना या स्वतंत्र टॅबव्दारे सहज मिळणार आहे.
नागरिकांना फीडबॅक फॉर्म…
नागरिकांना फीडबॅक फॉर्म कोणत्याही नागरिकांना पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर नागरिकांना पोलीस कर्मचा-यांच्या वर्तनाबाबत आपले अनुभव शेअर करता यावेत म्हणून नव्याने फीडबॅक फॉर्म तयार करण्यात आले असून त्यामुळे सेवा सुधारण्यात मदत होईल आणि जबाबदारीची भावना बळकट होईल.
भाडेकरूंच्या माहितीकरीता स्वतंत्र विभाग…
भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनमध्ये नोंदवणे आता अधिक सोपे झाले आहे. नव्या टॅबमुळे नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने ही माहिती भरता येईल. ज्यामुळे गुन्हेगारीस प्रतिबंध करणेस मदत होईल.
ई चलन टॅब…
वाहतूक चलनांची माहिती आणि ऑनलाईन दंड भरण्यासाठी स्वतंत्र टॅब तयार करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक नियमांचे पालन अधिक प्रभावीपणे होईल आणि नागरिकांचा वेळ वाचेल.
सोशल मीडियासह थेट संपर्क…
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना संकेस्थळावरुन सहज जोडले गेले आहे. नागरिक आता थेट सोशल मीडिया वरुन आम्हांशी संवाद साधू शकतात, तक्रारी, सूचना माहिती शेअर करु शकतात.
पोलीस उप-आयुक्तांच्या पोलीस स्टेशन भेटींसाठी नवा टॅब…
नागरिकांना पोलीस उप-आयुक्तांच्या पोलीस स्टेशन भेटींची माहिती मिळावी, तसेच पोलीस स्टेशनमधील कामकाजात पारदर्शकता यावी व नागरिकांना वरिष्ठ अधिका-यांच्या भेटीची माहिती व्हावी म्हणून या टॅबची निर्मिती करण्यात आली आहे.
















