न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२५) :- ऐन उन्हाळ्यात सेक्टर १२ येथील पीएमआरडीएच्या गृहप्रकल्पा-तील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. सुमारे अडीचशे कुटुंबे राहत आहेत. त्यांच्या या प्रश्नाकडे महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील रहिवासी करत आहेत.
येथील गृहप्रकल्पातील सोसायट्यांना महापालिका आणि पीएमआरडी या दोन्हीकडून पाणीप्रश्नी केवळ आश्वासन दिले जात आहे. प्रत्यक्षात त्याची दखल घेतली जात नसल्याने आता पीएमआरडीए कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा येथील महिलांनी दिला आहे.
सेक्टर १२ या ठिकाणी असलेल्या माहुलीगड आणि गोरखगड या दोन्ही सोसायटीमध्ये पाण्याच्या प्रश्नांवर गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात या दोन्ही इमारतींना अपुरा पाणीपुरवठा होत आहे.
पीएमआरडीए आणि महापालिका या दोन्ही विभागांनी यावर एकत्रित येऊन तोडगा काढावा, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.
















