न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२५) :- विकासकामांसाठी रस्ते खोदाई करण्यास १५ मेपर्यंतच परवानगी दिली आहे. त्यानंतर रस्ते खोदल्यास फौजदारी कारवाईचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. शहरात विविध सेवा वाहिन्यांच्या कामांसाठी वारंवार केले जाणारे खोदकाम आणि त्यानंतर केल्या जाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या रस्ते दुरुस्तीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागते.
अपघात टाळण्यासाठी शहरातील मुख्य रस्ते आणि अतिवर्दळीच्या रस्त्यांवरील जलवाहिन्या, ड्रेनेजलाइन, पावसाळी गटारे, इंटरनेट आणि अन्य केबल, एमएनजीएल तसेच, वीजवाहिन्यांची कामे येत्या १५ मेपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना महापालिकेने दिल्या आहेत. केवळ अत्यावश्यक बाब म्हणून काही कामांसाठी रस्ते खोदाईला परवानगी दिली जाणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार आहेत. पावसाळ्यात कोणत्याही कामासाठी रस्ते व पदपथ खोदकामास परवानगी दिली जाणार नाही. शहर परिसरामध्ये केवळ अत्यावश्यक व अतितातडीच्या कामांना अटी आणि नियम टाकून परवानगी दिली जाणार आहे. विनापरवाना खोदाई केल्यास कारवाई केली जाईल.
– मकरंद निकम, शहर अभियंता…
















