- रस्त्यावर पार्क केलेल्या दहा वाहनांच्या काचा फोडुन केलंय वाहनांच नुकसान..
- टोळक्याची घटनास्थळ परिसरातून धिंड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२५) :- भोसरीतील आदिनाथनगर परिसरात रविवारी (दि. २०) मध्यरात्री दोन तरुणांनी १३ वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना मध्यरात्री एक ते सव्वा एकच्या सुमारास घडली.
करण बाळू ससाणे (२०, रा. फुलेनगर, चिंचवड) आणि त्याचा १७ वर्षीय अल्पवयीन साथीदार यांनी दगड आणि कोयत्याचा वापर करून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दहा कार आणि एका टेम्पोची तोडफोड केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मध्यरात्री सुखवानी बाग हौसिंग सोसायटी, आदिनाथनगर येथे तोडफोड करू लागले. याबाबत रखवालदार म्हणून कार्यरत असलेले अमरसिंग मनबहादुर थापा (४७) यांनी पोलिसांना माहिती दिली. तसेच, त्यांनी आरडाओरड करत आरोपींना थांबवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी आरोपींनी त्यांच्या दिशेने एक वीट फेकून मारली. थापा सुदैवाने बाजूला झाल्याने बचावले. काही मिनिटातच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. थापा यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान भोसरीतील गव्हाणे वस्ती-आदिनाथनगर येथे १२ मोटारी आणि एका टेम्पोची तोडफोड करणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या टोळक्याची घटनास्थळ परिसरातून धिंड काढण्यात आली. करण बाळू ससाणे (२०, चिंचवड), संकेत दत्तात्रय पडर (२०, भोसरी), करण अमोल सासणे (९८, भोसरी) आणि प्रेम रवि गिरी (१८, भोसरी) अशी आरोपींची नावे आहेत. चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर, अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.











