न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २९ एप्रिल २०२५) :- पुणे महानगर प्रदेश क्षेत्रीय विकास प्राधिकरणाने सेक्टर ३०, ३२ आणि १२ या ठिकाणी गृहप्रकल्प योजना राबवली आहे. त्यातील सेक्टर १२ या पहिल्या टप्प्यातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाबाबत रहिवाशांच्या अनेक तक्रारी आहेत. तक्रारींमुळे संबंधित बांधकाम ठेकेदाराला पीएमआरडीएने दणका दिला असून, ठेकेदारास दिवसाला दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. त्यासाठी १६ कोटी देय थकवण्यात आलेले आहे.
पीएमआरडीएने सेक्टर १२ या पहिल्या टप्प्यामध्ये ४५ इमारतीमध्ये साडेचार हजारांहून अधिक सदनिका उभारल्या आहेत. यातील बहुतांश सोसायटीमध्ये अनेक तक्रारी आहेत. सदनिकांची गळती, पावसाळ्यात घरासमोर पाणी साचणे, निकृष्ट साहित्यांचा वापर आणि बंद पडलेले
सोलर पॅनल अशा सुमारे १ हजार १३६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे निकृष्ट कामांना जबाबदार धरत संबंधित ठेकेदाराला पीएमआरडीएकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, तरीदेखील संबंधित ठेकेदाराने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे ठेकेदाराला दोन ते अडीच लाखांचा दंड ठोठावण्यात आला. नागरिकांच्या तक्रारी आणि निकृष्ट बांधकाम याची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी या दंडामध्ये वाढ करून ती दहा लाख रुपये प्रतिदिन अशी करावी, अशी सूचना केली आहे.
ठेकेदारास दणका
मोठ्या प्रमाणात दंड ठोठावल्याने ठेकेदाराने त्वरित तक्रारींचा निपटारा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता या तक्रारीचे प्रमाण कमी होऊन २६ तक्रारी बाकी आहेत. काही सोसायटीमध्ये पाण्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेशी समन्वय साधला जात आहे. पाण्याची जबाबदारी त्यांची असल्याने त्याबाबत त्यांनी नियोजन करावे. या तक्रारी लवकरच सोडवल्या जातील, अशी माहिती महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी दिली.











